Gajanan Maharaj

Sunday, May 31, 2020

Sarvgya Majhi Gajanan Mauli Gajanan Maharaj Anubhav


सर्वज्ञ माझी गजानन माऊली


आपल्या ह्या पोस्ट वर आपण उदय हरीभाऊ जोशी ह्यांच्या गजानन महाराज अनुभव वाचणार आहोत, शब्दांकन "श्री जयंत वेळणकर"     

जय गजानन! गजानन महाराजांविषयी काही अनुभव मी कुणाला सांगेन असं मला तेव्हा अजिबात वाटलं नव्हतं की जेव्हा माझ्या लहानपणी मला आमच्या एका परिचिताने आमची अत्यंत बेताची आर्थिक परिस्थिती आणि त्यामुळे की काय माझी असणारी मनस्थिती लक्षात घेऊन मला गजानन विजय ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिला होता.
संतांच्या योजना ठरलेल्या असतात. गजानन विजय वाचनाच्या निमित्ताने मी महाराजांच्या संपर्कात यावं ही त्यांचीच योजना. पुढे मोठं झाल्यावर एकदा मलकापूरला ज्या वाड्यात प्रत्यक्ष महाराज येऊन गेलेत त्या वाड्यात जाण्याचा योग आला आणि ' स्थिर चर व्यापून उरणारं ते तत्व सर्वत्र भरून आहे ' या कल्पनेने मनाला स्पर्श केला.  मी उदय हरीभाऊ जोशी. नागपूरातील विकासनगर येथे एक गजानन महाराजांचं मंदिर आहे त्या मंदिरात वरती एका खोलीत श्री महाराजांच्या कृपेने आणि मंदिराच्या विश्वस्तांच्या योजनेमुळे माझं वास्तव्य आहे. मी आणि माझी वृध्द आई असे आम्ही दोघं तिथे राहतो . खरंतर माझी नेमणूक एक प्रकारे ' मंदिराकडे लक्ष देणे ' या कामासाठी झाली आहे. मंदिरात नित्य पूजेसाठी एक वेगळे गुरूजी नियुक्त आहेत. पण कधी काही कारणाने गुरूजींचं येणं जमलं नाही तर मी प्रसंगी मंदिरात पूजाही करतो, त्यामुळे मंदिरात दर्शनाला येणारे भाविक मला उदय गुरूजी याच नावाने जास्त ओळखतात.
मंदिरात सकाळी अकरा वाजता आरती होत असते. मला कुणी सांगितले नसले तरी मी माझ्यातर्फे एक गोष्ट ठरवून ठेवली आहे. ती अशी की मी नेमाने आरतीच्या वेळी निदान एक वाटीचा शिरा प्रसादासाठी करतो. शिरा नैवेद्यासाठी असायलाच हवा, असा एक प्रकारे परिपाठ ठरून गेला आहे. शिरा नैवेद्याचा हा शिरस्ता मला वाटतं कदाचित महाराजांनाही आवडला असावा. शिरा नैवेद्याकडे महाराजांचं लक्ष असण्याचा अनुभव मंदिरात  मला एक दोन वेळा आला त्यापैकी एक इथे सांगतो.
Sarvgya Majhi Gajanan Mauli Gajanan Maharaj Anubhav

मी आणि आई एकाच खोलीत राहतो त्यामुळे सर्व संसार, संसाराचा पसारा त्या एकाच खोलीत पसरलेला असतो. दुपारी सर्व कामं व जेवणं झाली की खोली आवरल्या जाते. अन्यथा सकाळी सर्व इतस्ततः विखुरलेलंच आढळेल एकदा सकाळी आरतीची वेळ होत आली, शिरा करायला घेतला, पण काही केल्या साखरेचा डबा काही सापडेना. जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा मानसिक गोंधळ होऊन सोपी गोष्ट कठीण होते हा आपल्या सर्वांचाच अनुभव असेल. अशा वेळी सहज सापडणारी गोष्टही डोळ्यांना दिसत नाही. त्या दिवशी असंच झालं. एकत्रच पसारा होता त्यामुळे डबा सापडणं काही अशक्य नव्हतं पण आता घड्याळात अकरा होत आले होते. डबा सापडूनही शिरा होणं काही आता शक्य नव्हतं कारण नियमानं येणारे लोक आता जमू लागले होते. मी महाराजांना हात जोडले आणि आज तुमची इच्छा काही वेगळी दिसते असं म्हणत खाली उतरलो. मी मंदिरात मागील दाराने आत शिरलो अन् समोर बघितलं तर मंदिराच्या मुख्य दारातून सौ सरिता गोखले घाई घाईने आत शिरत होत्या. त्यांच्या हातात एक डबा होता . डबा माझ्याकडे पुढे करीत त्या मला म्हणाल्या ' गुरूजी आज प्रसादाचा शिरा आमच्याकडून ! बरेच दिवसांपासून इच्छा होती. आज मुलगा सुमित जो बंगलोरला शिकायला असतो तो अनायसे  इथे आला आहे. तेव्हा सकाळीच घरी महाराजांना प्रार्थना केली की ' महाराज आज आमचा प्रसाद स्वीकार करा! ' मी त्यांच्या हातून डबा घेतला आणि त्यांना म्हटलं आज महाराजांना हाच प्रसाद हवा होता.

अजून एक अनुभव मला इथे सांगायचा आहे. तो आहे एका पुस्तकाच्या संदर्भात! " श्रीगजानन महाराज चरित्र कोश " या नावाचा एक ग्रंथ आहे. लेखक आहेत श्री भार्गवराम येवदेकर उर्फ दासभार्गव. शेगांव. या ग्रंथात गजानन विजय ग्रंथात उल्लेख असलेल्या विविध व्यक्तींचा आणि घटनांचा अत्यंत विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. संशोधनपूर्वक केलेलं हे अभ्यास पूर्ण लिखाण आहे. गजानन महाराजांच्या लकबी, दिनचर्या या विषयी विस्तृत माहिती आहे. असो. तर त्याचं असं झालं की माझे एक मित्र कलाकार आहेत. त्यांना गजानन महाराजांची भूमिका करण्याचा योग चालून आला. तेव्हा मला असं वाटलं की मित्राने जर  ' श्री गजानन महाराज चरित्र कोश ' ग्रंथ वाचला तर त्याला गजानन महाराजांची भूमिका सादर करण्यात सहाय्य होऊ शकेल. माझ्या परिचयातील एकाकडे हा ग्रंथ होता. मी तो त्यांच्याकडून मागून आणला आणि पंधरा दिवसांत वाचून परत कर असं सांगून मित्राला देऊ केला.
ग्रंथ फार संग्राह्य आणि जपून ठेवण्यासारखा आहे. त्यामुळे पंधरा दिवसांतच ज्यांचं पुस्तक होतं त्यांचा फोन आला. मी मित्राला आठवण करून दिली पण वर एक आठवडा उलटून गेला तरी पुस्तक काही मिळाले नाही. मित्राला विचारलं तर तो म्हणाला त्याने अन्य कुणाला ते दिले आहे. तशातच माझ्या एका भावाचं शेगांवला जाणं झालं त्याला म्हटलं शेगांवला पुस्तकाविषयी चौकशी कर तर तो चौकशी करायचं विसरला. अन्य कुठे मिळेल का? म्हणून चौकशी केली तर तेही शक्य झाले नाही. तो दुर्मिळ ग्रंथ सहजासहजी मिळेल कसा? एकंदरीत माझी सर्वच बाजूनी कोंडी झाली. पुस्तकाचे मालक सतत चौकशी करीत होते. या सगळ्यात एक महिना वर उलटून गेला. यात म्हटलं तर माझी चूक होती. पण माझा हेतू काही वाईट नव्हता. अशात एक दिवस समोरील माणसाचा संयम सुटला. मला आठवतं, त्या सकाळी मी मंदिरात महाराजांसमोर एकटा उभा होतो. अचानक पुस्तकाचे मालक मंदिरात आले, त्यांचा सात्विक संताप झाला होता. ते माझ्याशी चांगलेच खडसावून बोलले. मी निमूटपणे खाली मान घालून सगळं ऐकून घेतलं .मी त्यांना हात जोडून फक्त एवढंच म्हटलं की माझ्याकडे ते पुस्तक येताच मी तुम्हाला परत करीन. पाच दहा मिनिटं मला बोलून ते निघून गेलेत. मी मूर्तीसमोर उभा राहिलो आणि केवळ हात जोडले. बाकी काही बोलायला माझ्याकडे शब्द होतेच कुठे? तसंही महाराज सर्व जाणून होते!
ते गृहस्थ गेलेत. मी अंतर्मनात महाराजांशी बोलत राहिलो. अकराची आरती झाली. मला काही काम होतं म्हणून मी बाहेर पडलो. अस्वस्थ मनाने, यांत्रिक रितीने मी माझं काम उरकलं. मला आता मंदिर बंद करायचं होतं. मंदिरात बंद करताना सहसा कुणी नसतं, त्या दिवशीही कुणीही नव्हतं.  मी मंदिरात शिरलो आणि अचंबित होऊन पाहतच राहिलो. माझा माझ्याच डोळ्यांवर विश्वास बसेना
' श्रीगजानन महाराज चरित्र कोश ' ग्रंथ मी माझ्या समोर पाहत होतो. प्रथम स्पष्टपणे दिसलेला ग्रंथ आता मात्र डोळ्यातील पाण्यामुळे धूसर दिसत होता.
मी तो ग्रंथ त्या सद्गृहस्थांना देऊन सांगितलं की तुमचा ग्रंथ मिळेल तेव्हा मी हा परत मागून घेईन. तूर्त हा तुमच्याजवळ असू द्या!
दोन तीन दिवस तो ग्रंथ तिथे आला कसा? या प्रश्नावर विचार करण्यात उलटले. चौथे दिवशी मंदिरासमोर अचानक एक गृहस्थ समोर उभे ठाकले आणि मला विचारू लागले काय गुरूजी मिळाला का ग्रंथ? मी प्रश्नांकित चेहर्याने त्यांच्याकडे बघत राहिलो तेव्हा ते म्हणाले ' अहो तो आमच्या आईचा ग्रंथ! आता आई गेली. परवा अचानक कसे काय कोण जाणे? मनात आलं की आता हा ग्रंथ आपण गुरूजींसाठी मंदिरात ठेवून द्यावा. काय सांगावं? कदाचित कुणा सद्भक्ताच्या कामी येईल!'
मी त्या सद्गृहस्थांना हात जोडले. त्यांच्या कसे काय कोण जाणे? या प्रश्नाचे उत्तर कदाचित मला माहिती होतं आणि ते होतं | 

गजानन महाराज अनुभव-सर्वज्ञ माझी गजानन माऊली 

अनुभव--उदय हरीभाऊ जोशीविकासनगर गजानन महाराज मंदिर, नागपूरशब्दांकन-- जयंत वेलणकर


श्री गजानन! जय गजानन! श्री गजानन! जय गजानन!   श्री गजानन महाराज की जय 


No comments:

Post a Comment